Monday, May 23, 2016

Basbousa-पारंपारीक इजिप्शियन केक


मिस्टरांचा वाढदिवस म्ह्णून गुलाबजाम केलेले. एकुलतं एक गीट्सच पाकिट खास या दिवसासाठी राखून ठेवलेलं.
दुसर्या दिवशी मी त्यांच्या सहकार्यांसाठी गुलाबजाम घेऊन गेले. तर तिथे एका अरेबिक सहकार्याने केक आणला होता. एरवी "indian food,indian food" म्हणून टोळधाड टाकणारे आज त्या अरेबिक केक च्या पण मागे होते. मला खूप जणांनी- 'खाउन बघ तुमच्या गुलाब जाम सारखचं लागतयं' असं सांगितला. तर खरचं थोड्फार चवीला तसाच लागत होता तो केक! मग काय? तसही इथे खवा किंवा गुलाबजामचे जिन्नस मिळत नाहीतच. मग हे आवडतयं का करून बघु म्ह्णलं.
Google केलं तेव्हा याचे बरेच प्रकार सापड्ले. हा केक रव्यापासून बनवतात. हे एक पारंपारीक middle eastern dessert आहे. इजिप्त मध्ये याला बास्बोसा (Basbousa) तर टर्की मध्ये रेवणी असं म्ह्णतात. हेरीसा, नामोरा इ. अशी नामावली आहे.
लागणारा वेळ: 
साधारण २ तास
लागणारे जिन्नस: 
साखरेचा पाक:
१ १/२ वाट्या साखर
२ वाट्या पाणी
१ मोठा चमचा लिंबाचा रस
गुलाब पाणी/ व्हॅनिला इसेन्स
केकसाठी:
३ वाट्या रवा
१ वाटी डेसिकेटेड कोकोनट
१/२ वाटी साखर
१ चमचा बेकिंग पावडर
१०० ग्रॅम बटर
१ वाटी दूध
८/१०बदाम (सोललेले)
क्रमवार पाककृती: 
१. एका भांड्यात साखरेचा पाक करायला घ्या. त्यासाठी साखर आणि पाणी एकत्र करून गरम करण्यास ठेवा. साधारण एक उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी/ व्हॅनिला इसेन्स टाका. अजुन २ मिनीटांनी गॅस बंद करा.
२. दुसरीकडे एका भांड्यात रवा, डेसिकेटेड कोकोनट, साखर आणि बेकिंग पावडर घ्या. एकत्र करा.
३. त्यात बटर (वितळवून) आणि १ वाटी पाक घाला व नीट मिक्स करून घ्या.
४. त्यात कोमट दूध घालून सर्व एकजीव करून घ्या.(DO NOT OVERMIX).
५. नंतर केकच्या भांड्याला आतून बटर लाऊन घ्या व त्यात केक चे मिश्रण एकसारखे पसरा. त्यावर क्लिंग रॅप लाऊन ते १ तासासाठी फ्रिज मध्ये ठेवा.
६. बेकिंग करायच्या आधी हे मिश्रण २० मिनीटे बाहेर काढून ठेवा.
७. ओव्हन १८० से. ला प्रिहिट करा. केक आवडेल त्या आकारात कापा (मी डायमंड शेप ठेवलाय). त्यावर आवडेल अशी सोललेल्या बदामांची डिझाईन करा.
८. २०-२२ मिनीटे ओव्हन मध्ये बेक करा. मी नंतर ५ मिनीटे broil मोडवर ठेवला, मस्त ब्राऊन क्रस्ट येते वर.
९. ओव्हन मधून बाहेर काढल्यावर लगेच त्यावर थंड पाक घाला आवडेल तेवढा.
IMG-20160521-WA0013.jpg
IMG-20160521-WA0011.jpg
वाढणी/प्रमाण:
आवडेल तितका..
अधिक टिपा: 
१. हा केक रेग्युलर केक इतका फुगत नाही.
२. रवा कुठलाही चालेल.
३. मूळ रेसिपी मधे साखरेचे प्रमाण खूप आहे, मी इथे कमी केले आहे. तसेच शेवटी पाक सुद्धा किती घालायचा ते प्रत्येकाच्या आवडीनुसार... केक मधून गळेल इतका पाक असतो पण - केक maximum absorb करेल इतकाच मी घातला आहे.
४. सर्व साहित्य मिक्स केल्यवर हे मिश्रण रेग्युलर केक सारखे पातळ होत नाही... हाताने थापता येईल असे असते.
५. फ्लेवर मध्ये ऑरेंज वॉटर/ झेस्ट किंवा लेमन झेस्ट वापरू शकता ...केक खाता-खाता इथे लिहीतीय त्यामुळे idea सुचली.

IMG-20160521-WA0008.jpg



तनिष्का जून २०१६ मध्ये प्रकाशित

(तनिष्का जून २०१६ मध्ये प्रकाशित)
(तनिष्का जून २०१६ मध्ये प्रकाशित)

Monday, May 9, 2016

अरे, संसार संसार...

      दोन- तीन दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. नुकतच लग्न झालयं तीचं. म्हणाली " मोने, माझी चपाती फुगली" हे सांगताना तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. "अरे वा! मी सांगितलेला तुला, जमतं अगं हळू हळू" असं मी तिला म्हणाले तेव्हा माझं मलाचं हसू आलं कारण हेच वाक्य मला माझी आईही पहिल्या वेळी म्हणालेली. मला पण जाम भारी वाटलं.
      ताटात एक, तव्यावर एक आणि पोळपाटावर एक हे गणित आईसारखं मलाही जमू लागलयं. अर्थात त्याच आता फारसं कौतुक नाही आईने इतकी वर्ष केलं तेच मी जमवतेय. पण सुरूवातीला हे जमवताना आणि जमल्यावर माझी अवस्था माझ्या मैत्रिणीपेक्षा काय वेगळी नव्हती.
          College ला गेल्यावर आईचं रोज एक टुमणं असायचं " अगं चपात्या करायला शीक, कधी येणार? आता जमायला हवं ना!" …आज्जी आली कि डोळे मिचकावून मला सांगायची " मी वी असताना स्वयंपाक शिकले" . पण तोवर बॅग घेऊन आमचा टांगा पलटी घोडे फरार असायचे. ते वाक्य एका कानातून शिरेपर्यंत पलीकडून बाहेर पडून फिरायला गेलेलं असायचं. आईला शाळेतून यायला ऊशीर झाला कि पप्पांच्या मदतीने अर्धी खिंड लढवलेली असायची...भात भाजी तयार, पण कणीक बिचारी आकाराला यायची वाट बघत बसायची. नंतर नंतर भाकरी, वरण, भात जमू लागलं, पण तरी कधी डाळ missmatch व्हायची,कधी डाळ  खाली कि भात डाळीच्या खाली यात जाम confusion व्हायचं. भाकरी तव्यात टाकताना फाट्ली की जोर जोरात पप्पांना हाका मारून बोलवलं की ते येऊन जोडुन द्यायचे. तर अशी स्वत: करायची पाककला ज्याला आपण स्वयंपाक म्हणतो,  ती मी दुसर्यांच्या मदतीने जमवू लागले. तोपर्यंतच पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मुक्काम होस्टेलला हालवावा लागला.
      पुढे होस्टेल लागेल्यावर सगळा ठणठणाट... !!! कसल्या चपात्या अन कसलं काय!पण आईच्या हातच्या चपात्यांची खरी किंमत तिथे असताना समजली.मग सुट्टीत आल्यावर " आई तुझ्या सारखं कुठे तिथे खायला, दे ना चहा चपाती" अशी लाडी गोडी लाऊन चपात्या करण्यापासून पळ काढायचा.
पण होस्टेल संपल्यावर पुढच्या दोन महिन्यातच आमची विकेट पडली- लग्न ठरलं... महिन्यानंतरचा मुहूर्त पण धरला. तिथेही माझी पळवाट होतीच. चला चार महिन्यात शिकू चपात्या, त्यात काय एव्हढं? म्हणजे जरा tension आलं होतं. आईने  सासुबाईंना " आताच होस्टेल मधून आलीय..स्वयंपाकाची फारशी सवय नाहीये" असं सांगून ढाल पुढे केलेली, पण वार व्हायचा थांबणार नाही हे अख्ख्या घरा-दाराला माहित होतं. त्यामुळे नेट प्रॅक्टिस लगेचच सुरू झाली. सुरूवात बरी होती. आई चपात्या भाजायला उभी असली की बर्या व्हायच्या पण इतरवेळी चपाती वेगवेगळे देश फिरून यायची, तवा करपून जायचा तरी घरातले सगळे " छान झाल्यात हा चपात्या" म्हणून चालवून घ्यायचे.
      त्यानंतर १५ दिवसातच मी तोंडावर पडले म्हणजे जवळजवळ आपटलेच. पीएल्समधे करू कि अभ्यास म्हणून ठेवलेला  हा syllabus, पण परीक्षाच prepone झाली तर...? हा विचार कोणी केलेला? तसच काहीस आमच लग्नच काही कारणामुळे १० दिवसांनी घेतलं. कॉपी वगैरे करून सोडवण्यासारखा हा प्रश्न नव्हताच नै का. लग्न घरातल्या गडबडीमध्ये ते १०-१५दिवसही चटकन गेले.
     त्या दिवशी संध्याकाळी सासरी घरातले सगळे काही कामानिमित्त बाहेर निघालेले. घरी मी आणि नवरोबा फक्त. पण जाताना सासुबाई मोठ्ठी प्रश्न्नपत्रिका देउन गेल्या. - माणसांसाठी वरण-भात, चपात्या आणि "फ्रिज मध्ये कणिक नाहीये मळावी लागेल" अस ही म्हणाल्या. झाली का पंचाईत! वर optional प्रश्नही नव्हते होमाहेरी इन- मीन चार माणसं, १० चपात्यांवर आकडा कधी गेला नाही. आता कुठे तोंड लपवू असं झालं. कणिक मळायला घेतली ... तिथे तरी पैकीच्या पैकी... पहीला प्रश्न येतोच हो. कूकर घेतला मोठ्ठा कूकर उचलता उचलेना, किती भात -किती डाळ घेऊ समजेना. भांड्यांचा आवाज ऐकून पतिदेव आत आले. बहुदा माझ्या मनातला गोंधळ त्यांनी ओळखला, मी मदत करतो म्हणाले.
      गुणाचा गं माझा नवरा!!! कित्ती कौतुक केलं मी (मनात ;) )..." नाही जमत हो मला चपात्या...आता काहीच समजेना" सांगून टाकलं मी. म्हणाले " कशाला काळजी करतेस्,दोघ मिळून करू जसं जमेल तसं" माझा जीव भांड्यात नव्हे  टबात पडला. मग डाळ-तांदुळ घेऊन त्याचे आठ-आठ भाग करून मीठ्,हिंग टाकून भात-  वरण लावलं. भाताच्या खाली डाळ कि डाळीच्या खाली भात यामध्ये दोघेही confuse झालो खरे, पण शेवटी लागला एकदाचा कूकर.
             मग चपात्या करायला घेतल्या. सगळं नीट मांडून घेतलं आणि हे भाजायला उभे राहीले. एक तव्यावर आणि एक पोळपाटावर असं गणित जुळण्यासाठी...पहिली चपाती लाटून ताटात काढून ठेवली...(अर्थात ह्यांच्या सांगण्यावरून). जमलं मग, जशा जमतील तशा लाटून दिल्या ह्यांनी भाजुन घेतल्या. प्रत्येकाच्या असं गणित मांडून चपात्यांचा आकडा आम्हीच ठरवला.
      चपात्यांचे काठ जाड झाले, तवा करपला, भातात किंचीत पाणी जास्त झाल्यामुळे बाळाचा मऊमऊ भात झालेला, वरण बरं झालेलं, कूकर मध्ये लिंबाची फोड टाकायची राहून गेल्याने तो आतून थोडासा काळा पडलेला... पण  शेवटी काय operation चपात्या  आणि कूकर successful!!! हा आता या परीक्षेचा रिझल्ट काय लागला ते नाही सांगत पण क्रेडीट मलाच दिलं हे वेगळं सांगायला नको...ते फक्त आम्हां दोघांमधलं सिक्रेट आजपर्यंतच!!!त्या दिवशी जेवताना मनात आईची आठ्वण होती, एकदम एव्ह्ड्या चपात्या जमल्याचा आनंदही होता, सासरी आल्यावर मुलीला  ज्या खंबीर मानसिक आधाराची गरज असते तो मिळाला आणि आमच्या नव्या नात्याचा पायाही घट्ट रूजला.

      अशी ही चपात्यांची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरा सुफल संपुर्ण! आज कितीही लुसलुशीत, पदर सुट्लेल्या चपात्या मी बनवल्या तरी आईच्या हातच्या चहा- चपातीची आठवण आल्याशिवाय राहात नाही.