Monday, July 4, 2016

शक्शुका

हे नाव वाचताना जरा सांभाळून, नाही म्हणजे ...मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला तेव्हा जीभ अडखळून शुकशुक्शुका झालं आणि मराठी टायपताना तर काय हाल झाले विचारू नका... फिदीफिदी
शक्शुका हा इस्रायली पदार्थ आहे. अरेबीक आणि लेबनीज खाद्यातही या पदार्थाचा समावेश होतो. हा कॉफी, ब्रेड सोबत खाल्ला जातो. यात अंडी हा मुख्य घटक असतो. लाल/ हिरवी ढब्बू मिरची, पालक या भाज्याही यात वापरल्या जातात. इथे टोमॅटो प्युरी वापरतात, त्यामुळे पातळ करी सारखा शक्शुका पण मिळतो आणि त्यात काळीमीरी/ पॅपरीका व मीठ वापरतात. माझ्या इथल्या मैत्रिणीने बदल करून भारतीय व्हर्जन बनवलयं . ब्रंच म्हणून भारी, पोटभरीचे आणि झटपट होते.
लागणारा वेळ: 
१५ ते २०मिनीटे
लागणारे जिन्नस: 
२-३ चमचे तेल
४ अंडी
४-५ बारीक चिरलेले टोमॅटो
१ छोटा कांदा उभा चिरून
१ चमचा बारीक चिरलेला लसून/ पेस्ट
२ चमचे तिखट
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धनेपूड
१ चमचा साखर
हळद
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
चाट मसाला
चीज (मोझ्झरेला/पर्मेसन)
क्रमवार पाककृती: 
१. पसरट खोलगट पॅनमध्ये किंवा कढईत २-३ चमचे तेल तापवून घ्यावे. त्यात लसून परतून कांदा घालावा.
२. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा आणि त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घाला.
३. त्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर टोमॅटो शिजवून घ्यावेत. (आवडत असेल तर रेडीमेड टोमॅटो प्युरी ही घालू शकता.)
४. त्यात साखर, तिखट, हळद, धनेपूड-जिरेपूड आणि मीठ टाकून एकजीव करून घ्यावेत.
५. त्या मिश्रणात अंड्यांकरता ४ ठीकाणी जागा करावी. त्यात एक-एक अंडे फोडून त्यात टाकावे. प्रत्येक अंड्यात एकसारखे अंतर राहू द्यावे.
६. झाकण ठेऊन शिजू द्यावे.( अर्धे शिजवलेले पण मस्त लागते)
७. वरून थोडे मीठ, चाट मसाला, किसलेले चीज आणि कोथिंबीर टाका.
IMG-20160705-WA0007.jpg
IMG-20160705-WA0006.jpg
(गार्निश करण्याआधीचा फोटो)
वाढणी/प्रमाण:
२-३ माणसांना पुरेल…
नुस्तही खाता येत किंवा साधा ब्रेड/ चपाती सोबत…
अधिक टिपा: 
1.  मसाल्यानुसार तुम्हाला हवे तसे बदल करा. मी घरचं कोल्हापुरी तिखट वापरलयं. जास्तीत जास्त लाल रंग आला की मस्त दिसत आणि चवही मस्त येते.
2. अंडी टाकल्यावर हालवू नये. वाढताना केक सारखे भाग करून वाढावे.
३. मीठ फक्त कांदा- टोमॅटोच्या मिश्रणाच्या चवी पुरते वापरावे. अंड्यांसाठी वरून थोडेसे टाकावे. नाहीतर खालचा भाग जास्त खारट लागतो.