Tuesday, August 8, 2017

बालपणीचा काळ सुखाचा


काही दिवसांपूर्वी मॉल मध्ये पुतण्यासाठी खेळणी शोधत होते. त्या दुकानात मुलींच्या टॉय्ज सेक्शन मध्ये सहज लक्ष गेलं. पाहिलं तर मुलांपेक्षा मुलींच्या सेक्शनला जास्त व्हरायटी होती. खास छोटे छोटे दागिने बनवण्यासाठी रंगीत बीड्स , रंगीबेरंगी बाहुल्या त्यांचे ड्रेसेस... भरीस भर म्हणून छोटुकले स्ट्रॉलर पण...भलताच इंटरेस्ट आला म्हणून थोडं पुढे चालत गेले तर पुढे मोठ्ठ्या कपाटात वेगवेगळ्या डिझाईन्सचे टॉय किचन्स लावून ठेवलेले. त्यात खोटाखोटा गॅस, पॅन्स, छोटी भांडी काहींम्धे तर फ्रिज आणि ओव्हनही होता... तिथे एक 6-7 वर्षांची छोटुकली "हा सेट घेऊया ना" म्हणून आईजवळ हट्ट करत होती. माझं मन नकळत भूतकाळात गेलं.



तो दिवस आठवला, ज्या दिवशी माझ्या आज्जीने पिशवी भरून भातुकलीचा खेळ दिलेला. सग्गळी भांडी पितळेची...छोटे तवे, कप-बश्या, कढया, चमचे झारे...हे कमी काय म्हणून त्यात आमच्या आजोबांनी मातीची चूल आणि चिनी मातीच्या कप-बश्यांचा सेटची भर घातली. ते सगळं बघून आनंद गगनात मावत नव्हता. ती भातुकली परंपरागत म्हटली तरी चालेल. आधी ती माझ्या आईने वापरली, मग मावशीने नंतर ती माझ्याकडे आली. आमच्या आवडीनुसार काही स्टीलची खेळणी आम्ही त्यात टाकली होती. अर्थात त्यातली बरीच खेळणी वजा झाली होती-काही हरवली, काही मोडली पण त्यात भरलेला आनंद सारखाच होता.

दिवाळी आणि ऊन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही भावंडे एकत्र जमायचो. ती पितळी भातुकली माळ्यावरून खाली यायची. मग आमचा ठरलेला प्रोग्राम असायचा. घरातल्या बायकांकडून चिंच, मीठ, लिंबू, राख अशा गोष्टी जमवायला सुरूवात व्हायची. नारळाच्या केसरांची घासणी बनवून घेतली कि छोटुकली फौज कामाला लागायची. नीट एक-एक भांडे जमेल त्या पद्धतीने घासून चमकवले जायचे.  एकाने भांडी धुवायची, एकजण ती सगळी घासायचा, एकजण धुवून घ्यायचा आणि मग शेवटचा टप्पा- ती सगळी भातुकली अंगणात उन्हात पसरवून वाळवली जायची. अश्या मोठ्ठ्या "अवघड" कार्यक्रमानंतर घरातल्या बायकांकडून "बाई गं खूप काम केलं आज पोरांनी!" असे कौतुकास्पद शब्द ऐकवले जायचे आणि मग मस्त पोरांचा आवडता भेळीचा किंवा आवडत्या पदार्थाचा कार्यक्रम व्हायचा. 

त्यानंतर आमची भातुकली खेळायला तयार... पोरं-पोरी सगळे यात सहभागी असायचे. कधी गच्चीत, कधी अंगणात झाडाखाली चादरीचा तंबू घातला जायचा. भर दुपारी ऊन असेल तर आम्हा पोरांना बाहेर जाता येणार नाही अशी सक्त ताकिद असायची. त्यामुळे हा भातुकलीचा खेळ भारी रंगायचा. दररोज घरात घडणार्‍या गोष्टी तिथे यायच्या. पाण्याच्या घागरी भरून आकारानुसार त्याची रास मांडली जायची. यात बरेच नकली नट असायचे- सकाळी दूधवाला दूध घालायला यायचा, पेपरवाला पेपर टाकून जायचा. एखादा पोस्ट्मन मधेअधे पत्र घेऊन यायचा. कोणी ऑफिसला जायचं, कोणी स्वयंपाक करायचं. बरेचदा एकालाच २-३ भूमिका कराव्या लागायच्या. वाळू, फुले-पाने,कापूस यांचा खोट्या खोट्या जेवणात उपयोग केला जायचा. मग खाऊ म्हणून चुरमुळे, शेव, काजू-बदाम आणि आमचे आवडते गुळ-शेंगदाण्याचे लाडू यायचे. धम्माल असायची. कधीकधी आजोबा जवळ बसले असायचे. मग त्यांच्या देखरेखीखाली चूल पेटवली जायची. त्यावर पातेल्यात दूध गरम करून चहा ..(खर्राखुर्रा हं) बनवला जायचा. तो सर्वांना छोट्याशा पितळी कपबशात द्यायचा.

एकदा तर आम्ही घराला चक्क बेल बसवली होती... कार शूटींगचा गेम नवीनच घरात आलेला. त्यात काही प्लास्टीकच्या कार होत्या आणि त्याला एक स्टँड. त्या स्टँडमध्ये कार अडकवायची आणि बटन दाबले कि ती कार उडून सुसाट पुढे जायची.  खेळून खेळून त्याचा पिट्टा पडलेला. कंटाळा आला तशी ही कल्पना आमच्या डोक्यात आली.  तसे ते स्टँड आम्ही घराची बेल म्हणून वापरू लागलो. अर्थात त्यातून काही आवाज व्हायचा नाही पण गाडी उडून घरात यायची आणि "दार उघडा" असा संदेश मिळायचा. एकदा तर हद्द झाली... एका छोट्या भावाने त्याच्या रबरी खेळण्यातली पाल भातुकलीत खेळायला आणली. 'ईईई...ही का आणलीस?' असे विचारल्यावर म्हणतो कसा, 'घरात भिंतीवर पाल असते कि तशी आपल्या भातुकली मध्ये नको का?'  आम्ही किळसवाण्या नजरेने त्याच्याकडे बघितलं.  असे एक ना दोन, अनेक उद्योग!!!
सुट्टी संपत आली कि ती भातुकली धुवून पुसून परत माळ्यावर स्थिरावायची, पुढच्या सुट्टीची वाट बघत...

पुढे जसे आम्ही मोठे होत गेलो... अभ्यास वाढला, तसं सुट्ट्यांमधे गावी जाणं कमी झालं. सुट्ट्याही कमी झाल्या. मग आज्जी आम्ही येणार म्हटलो कि भांडी साफ-सूफ करून ठेवायची. नंतर नंतर तेही कमी झालं.

हा किचन सेट बघता बघता बालपणीच्या त्या गोड आठवणींनी डोळे भरून आले. दोन्हीमध्ये जमीन- आसमानाचा फरक असला  तरी भावना त्याच होत्या. एवढ्या वेळात बहुतेक त्या मायालेकिंचा निर्णय झाला असावा. हे 'किचन चांगलं कि ते' यात दोघींची चढाओढ सुरू होती. "चला, या छोटुकलीलाही तिचा आनंद गवसणार बहुदा" या आनंदातच मी तिथून काढता पाय घेतला.





Friday, August 4, 2017

सागर किनारे...

इलात... म्हणजे इस्राइलचं दक्षिण टोक... नकाशावर बघाल तर जास्त समजेल. मला आवडलेल्या इस्राईल मधलं हे पहिलं पान असू शकतं. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण भागांपैकी एक. इस्राइलचं अजून एक नवं रूप माझ्यासमोर उलगडलं गेलं. रेखोवोत ते इलात ५ तासांचा सगळ्यात मोठा आणि भारी कंटाळवाणा प्रवास होता. बसमधून रस्त्याच्या समांतरच काही अंतरावर काटेरी कुंपण दिसत होते आणि त्याच्या पलिकडे अजून एक रस्ता, रहदारी, घरे...तर ही होती जॉर्डनची बॉर्डर. जसा अलिकडे तसाच पलिकडचा नजारा होता. जाताना बर्‍याच खजुराच्या बागाही लागल्या. आमच्या इस्राईलचे खजूर जगात एक नंबर बरं का!! :) या प्रवासाने अंग चांगलच आंबून गेलं होतं...पण त्यानंतर पाहिला तो हा जमिनीवरचा स्वर्ग...सगळा कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला. इथे स्वर्गाची व्याख्या म्हणजे समुद्र अशीच... लहानपणापासून मला समुद्र आवडतो, त्यामुळेच कि काय, ही जागा जरा जास्त आवडली. आता इथल्या सौंदर्याची तुलना मात्र कशासोबतही करू नका. इलात एक छोटसं गाव. काही खजूराच्या बागा, कि मग गाव सुरू. तिथून पुढे लहानसं एअरपोर्ट, आजूबाजूला बरीचशी हॉटेल्स आणि मग समुद्रच, एवढच काय ते इलात.


Eilat harbour


खरं तर आम्ही कॉन्फरन्स साठी गेलो होतो. अर्थात त्या नावाखाली आम्ही मनसोक्त हुंदडून घेतलं. इलात हे इस्राईलच खरंखुरं पर्यटन स्थळ आहे. इथे बाकी बघण्यासारखी पर्यटन स्थळं असली तरी इथे पर्यटनाचे व्यावसायिकरण झाले आहे. पण त्याचा परिणाम मात्र इथल्या निसर्गावर अजूनतरी झालेला नाही. मुळात इथली भौगोलीक परिस्थिती आकर्षक आहे. तुम्ही इलातच्या कुठल्याही समुद्रकिनार्‍यावर ऊभे राहीलात तर तुम्हाला उजव्या बाजूला इजिप्तची बॉर्डर दिसेल तर डाव्या बाजूला अकाबा (जॉर्डन) आणि सौदीचे किनारे दिसतील आणि मधे दूरवर पसरलेला तांबडा समुद्र. इथे बरेच पर्यटक येतात, त्यामुळे इथे स्थानिक लोक खूप कमी राहतात. इथे किनार्‍यांवर बरीचशी हॉटेल्स आहेत. हा तांबडा समुद्र इतर समुद्रांच्या तुलनेत बराच उथळ आहे. त्यामुळे समुद्रात पोहणे आणि ऊन खात किनार्‍यावर पडून राहणे, एवढ्यासाठी लोक खास सुट्टी काढून इथे येतात. आम्ही ४ दिवसातले २ दिवस फिरण्यासाठी ठेवले होते. त्यानुसार डॉल्फिन रीफ, अंडरवॉटर ऑब्सर्वेटरी आणि खरेदी करून एक दिवस फक्त समुद्रात घालवायचा आमचा प्लान होता. तसे इथे २ दिवसांची सुट्टी पुरेशी आहे.
समुद्रातून दिसणारे इलात

दुसरी बाजू- जॉर्डन

डॉल्फिन रीफ इथलं खास आकर्षण. इथे डॉल्फिन्स सोबत स्नॉर्कलिंग ही करता येते आणि डायव्हींग सुद्धा. त्या दिवशी वातावरण ढगाळ होते. त्यामुळे आम्ही आमचा प्लान बदलला आणि त्यांना बाहेरून बघण्याचा निर्णय घेतला. इथले डॉल्फिन्स बंदिस्त जागेत ठेवलेले नाहीत, ते कधीही कुठेही फिरू शकतात. पण ते परत किनार्‍यावर त्यांच्यासाठी असलेल्या जागेत परत येतात. त्यांची बरीच माहीती त्यांच्या केअर टेकर ने आम्हाला दिली. हे मासे साधारण २५ ते ३० वर्षापर्यंत जगतात. ते कुटुंबासारखे तिथे एकत्र राहतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून, स्वभाव, आवडत्या व्यक्तींपर्यंत सगळ्या गोष्टी माणसांसारख्या आहेत. लाड करून घेतात, प्रेम करतात, मधेअधे चिडतात सुद्धा आणि त्यांच्या कुटुंबकबिल्यावर रूसून सुद्धा बसतात. इथे एकूण ५ डॉल्फिन्स आहेत- सिंडी, नाना, निकीता, शाय, लुना आणि शेबा(भारतीय नावं ऐकून भारी मज्जा वाटली). Israeli Marine Mammal Research and Assistance Center  मधे त्यांच्यावर रीसर्च केला जातो. इतके दिवस फोटोत बघत असलेला हा हसरा मासा मला तरी जाम आवडला.
तांबडा समुद्र- स्वच्छ आणि नितळ किनारे

डॉल्फिन रीफच्या ऑफिसजवळ निवांत फिरणारा मोर

निकीता

नाना- तिच्या लाडक्या केअरटेकर सोबत
लाड करून घेताना



शाय

इथून पुढे आम्ही अंडरवॉटर ऑब्सर्वेटरीला गेलो. हे खास पर्यट्कांसाठी बनवलेलं स्थळ आहे.  तांबड्या समुद्रात सापडणारे मासे आणि इतर प्राणी हे इथलं खास आकर्षण. आतापर्यंत वाटायचं शार्क हा एकच मासा आहे, पण इथे येऊन शार्कच्या २० जाती पाहिल्या तेव्हा आमच्या तोडक्या-मोडक्या भौगोलिक ज्ञानाची किव आली.




शार्कटँक




Ray fish







समुद्रात खोल अंधार्‍या जागी आढळणारी स्वयंप्रकाशी प्रवाळे (Fluroscent corals)






अक्वॅरीअम मध्ये ठेवेलेले नवनवीन जीव अजबच होते पण त्याहून भारी म्हणजे इथून काही अंतरावर एक टॉवर बांधलेला आहे. तो पाण्यात ६ मीटर्स खोलीवर बांधला आहे. खाली त्याला बर्‍याच काचेच्या खिड्क्या केल्या आहेत. त्यातून दिसणारं जग खरच अद्भुत आहे. रंगीबेरंगी मासे आणि तांबड्या समुद्राच वैशिष्ट्य म्हणजे अद्भुत  आकाराची आणि रंगांची प्रवाळं. इथे एक ग्लास बोट आहे. त्यातूनही  ही अद्भुत सफर करता येते.





त्या टॉवरवर चढून गेल्यावर समोर निळाशार समुद्र दिसला आणि मला कुसुमाग्रजांच्या या ओळी आठवल्या...
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

ही ऑब्सर्वेटरी फिरता फिरता आमचे ३-३.३० तास कसे संपले समजलच नाही.
 संध्याकाळी शॉपिंग, मग Ice space आणि गडबड गोंधळ घालून शोधून काढलेल्या भारतीय रेस्टोरंट मध्ये जेवण असा आमचा बेत ठरला. इलात मध्ये लोक खास शॉपिंग करण्यासाठी येतात. कारण हा टॅक्स फ्री झोन म्हणून ओळखला जातो. इथे कुठल्या वस्तूवर GST लागू होत नाही. संध्याकाळ होत आलेली त्यामुळे सगळे किनारे झगमगत्या प्रकाशाने न्हाऊन निघत होते. थोडावेळ दुकाने पालथी घालून  आम्ही Ice space ला गेलो. इथे उत्तर ध्रुवा सारखे वातावरण तयार केले आहे. तिथल्या प्राण्यांची विविध sculptures बर्फात बनवलेली आहेत. आतमध्ये छोटासा आइस बार आहे आणि स्लाइडींग वे केला आहे. ध्रुवांवरच्या काही वनस्पती आणि माश्यांचे अवशेष बर्फात जतन करून ठेवले आहेत. तिथून बाहेर पडल्यावर आम्ही मोर्चा भारतीय रेस्टोरंटक्डे  वळवला. बर्‍याच दिवसानंतर भारतीय जेवणाने पोटातल्या कावळ्यांची ओरड शांत केली.











दुसर्‍या दिवशी दुपारी ४ आम्हाला निघायचे असल्याने आम्ही आमची सकाळ खाण्यापिण्यात सत्कारणी लाऊन समुद्रात मनसोक्त डुंबायचा प्लान केला. १० वाजता कोरल रीफ बीच शोधून आम्ही स्नॉर्कलिंग किट्स घेतले. आज सूर्यनारायणाने दर्शनही दिलं होतं, त्यामुळे स्नॉर्कलिंग साठी आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला.  स्कुबा  डायव्हींग करताना instructor सोबत असल्याने फारशी काळजी करावी लागत नाही. स्नॉर्कलिंग त्याहून सोप्पे पण तरी एकटीने समुद्रात जायची वेळ असल्याने थोडी भीती वाटली. त्यात थंडगार पाणी. पण या समुद्रात लाटा नसल्याने पाण्यात गेल्यावर भीती कमी झाली. सुरवातीला पाण्यात डोके घातल्यावर जरा घाबरले, पण खाली डोळे उघडून बघितल्यावर जो आनंद झाला तो मी शब्दात नाही सांगू शकत. काही कळायच्या आत, झर्र्र्र्र्रकन... एक सोनेरी पुंजका डोळ्यासमोरून गेला. नीट पाहिल्यावर समजलं, त्या छोट्या सोनेरी मासोळ्या होत्या. काही मासे एकएकटे फिरत होते, काही घोळक्यात. छोटे, मोठे, सप्तरंगी, काळे, पांढरे ...कित्ती वेगवेगळे म्हणून सांगू! याशिवाय रंगीबेरंगी प्रवाळं, इतर जीव ...भर्र्र्र्र्रपूर प्रकार होते. मुळात त्यांना नैसर्गिक रित्या मोकळेपणाने फिरताना बघण्यात जास्त मौज होती. 




नव्या अर्थाने मी समुद्राच्या प्रेमात पडले. कित्ती गोष्टी तो पोटात दडवून बसलेला असतो ना? बाहेरून शांत, निश्चल पण आतमध्ये एक आख्खं जग पोटात घेउन जगत असतो आणि जगवत असतो. मला इथे येऊन समजलेली अजून एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक समुद्र वेगळा असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाच्या पोटातली गुपितं वेगळी...प्रत्येक जण एक नवीन गोष्ट शिकवत असतो. काचपेट्यांमधले मासे बघण्यापेक्षा हा जिवंत अनुभव मला जास्त आनंद देऊन गेला. साधारण २-२.३० तास या जगात घालवून आम्ही परतलो आणि परतीची वाट पकडली.

आमच्या हॉटेलच्या बाल्कनीतुन दिसणारे उजळलेले  इलात आणि जॉर्डन