Sunday, August 14, 2016

आवडसी तू -पावभाजी


कोणी बनवला असेल बर पहिल्यांदा पावभाजी हा पदार्थ... मला रोज जरी कोणी पावभाजी खायला दिली ना तरी मी न कंटाळता खाइन आणि "अन्नदाता सुखी भव" म्हणताना त्याला नेहमी धन्यवाद देइन.. माझा सगळ्यात आवडता जिवलग पदार्थ... हो हो जिवलगच बरं का!!! एखाद्या नवीन रेस्टोरंट मध्ये गेल्यावर, माझ्या टेबलवर येणार ती पावभाजी... कारण- दुसर्‍या पदार्थाची चव न आवडण्याची शक्यता असू शकते पण पावभाजी जगातला कुठलाही शेफ नसलेला माणूस बनवू शकतो... रिस्क फॅक्टर शून्य!!! ;)
आमच्या लहानपणी कॉलनीत एक पावभाजीवाला यायचा. फेरीवाले कसे असतात तसा... लाल रंगाची पॅगो रिक्शा घेऊन यायचा. त्यावर त्याचा नंबर लिहीलेला असायचा... लहान मुलांच्या बर्थडे पार्टीज् च्या ऑर्डरी घ्यायचा तो. रिक्शाचा मागचा भाग हॉटेलच्या काऊंटरसारखा...जो रिक्शा चालवताना बंद असायचा. मग गाडी लावली कि तो उचलून त्याचे काऊंटर... त्यावर चिरलेले कांदा टोमॅटो कोथिंबीरीची आरास असायची आणि आत पावभाजी बनवायसाठी लागणारी आयुधे. संध्याकाळी फट् फट् फट् रिक्शाचा कर्णकर्कश्श आवाज आला कि आम्ही असेल नसेल तिथून वार्‍यासारखे धावत यायचो. आता पावभाजी खायला मिळणार या आनंदापेक्षा तो बनवतो कसा याचा ऊत्साह अधिक असायचा. त्याचा मोठ्ठा तवा.. आधी गरम तव्यात बटर टाकायचा, भस्सकन त्या बटरचा धूर व्हायचा आणि मस्त बटरचा सुगंध दरवळायचा. त्यात घाईघाईने २-३ छोट्या छोट्या डब्यातून काहीबाही टाकायचा. लहानपणी काय ते कळायचे नाही (पण आलं-लसून पेस्ट असे काहीतरी असावे). मग त्यात कांदा-टोमॅटो परतायचा...नंतर एका बाजूला शिजलेले वाटाणे, त्याच्या बाजूला शिजलेला बटाटा, फ्लॉवर आणि ढब्बू मिरची असं स्सगळ्ळ्ळ मांडून घ्यायचा आणि मग त्याच्याकडच्या लांब उलतण्यांनी ते चांग्गलं कुस्करून मिक्स करून घ्यायचा. मग मसाला मीठ त्याच्या खास पद्धतीने त्यावर मारायचा. भाजी फुसफुसु लागली कि चांगली हालवून वर कांदा, कोथिंबीर, बटर पसरवायचा. मग आम्ही डबा नेला असेल तर किंवा त्याच्याकडच्या प्लेट मध्ये अलगद त्या भाजीचा भाग काढून द्यायचा. पावही मग त्या भाजीच्या तव्यावर एका बाजूला खरपूस  भाजायचा ...त्यात त्याच्या खास भाजीचा स्वादही असायचा. अजूनही त्याच्या पावभाजीची चव जिभेवर रेंगाळते.
दुसरी जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी मी पावभाजी करायला शिकले. बाकी काही( स्वयंपाक घरातील इतर पदार्थ :D ) जमत नसताना, आईने शिकवलेला हा एकुलता एक पदार्थ मला खास जमायचा. सोप्पा आणि सुटसुटीत, लगेच होणारा. आमच्या घरी आज काही वेगळं करूया असं वाटलं की हमखास पावभाजी ऑप्शन ठरलेला. का तर, या साठी लागणार्‍या भाज्या हमखास फ्रिजमध्ये पडून वाट बघतच असतात, 'आता कधी एकदा आपण या थंडीतून बाहेर पडतोय आणि कोणत्या विधीसाठी वापरले जातोय, कोणास ठाऊक?'… पावभाजी मसाला असला की झाले. दळणे, वाटणे, कुटणे, भिजवून ठेवणे असल्या फुकटच्या कटकटी नसतात. झटपट तयार होणारा आणि पौष्टीक पदार्थ, हे महत्त्वाचे. एरव्ही कधीही स्वयंपाकघरात पाऊल न ठेवणारी मी, पावभाजी करणार म्हटलं की ४ वाजल्यापासून कामाला हजर. सगळ्या गोष्टी बारीक चिरून, कुकरी शो मध्ये मांडून ठेवतात तसं मांडून ठेवायचे. मग एकेक करत विधीवत त्यांच्यावर संस्कार करायचे. लालभडक रंग येऊन भाजी रटरटू लागली की मगच थांबायचे. त्यातून वाटीभर भाजी उरलीच आणि जर दुसर्‍या दिवशी ती आपल्या वाट्याला आलीच तर... आनंदी आनंद गडेच!!!
मुळातच मी खाद्यप्रेमी... नवीन नवीन पदार्थ खायला मला प्रचंड आवडतं... घरातले असू देत नैतर बाहेरचे मी जामच फॅन... त्यामुळे माझे मैत्रही सगळे माझ्या टाईपचे. काहीही खायला जायचं म्हटलं कि सगळे एकत्रच. त्यातही पाणीपुरी, दाबेली, पावभाजीफॅन जास्त. माझ्या बर्‍याच मैत्रिणींचा पावभाजी हा आवडता मेन्यु... मग त्यांच्याकडे जायचा प्लॅन असला की पावभाजी ठरलेली. प्रत्येक घरची चव वेगळी आणि लाजवाब...गरम गरम भाजीवर भरपूर बटर, लालभडक रंग कधीकधी किसलेले चीझ... कडक भाजलेला बटरपाव किंवा मग मसाला पाव असायचाच सोबतीला लज्जत वाढवायला. ११वीत असताना मी एमब्रॉयडरीचा का कसलासा क्लास लावलेला. एकदा त्या शिकवणार्‍या काकूंच्या घरी इडली आणि पावभाजी केलेली. त्यांच्या मुलीने इडली आणि पावभाजी एकत्र असा प्रयोग केलेला. इडलीचे तुकडे करून ते थोड्याशा पावभाजीत फ्राय केलेले... सुरूवातिला ऐकताना कसेसेच झाले पण असला सॉलिड्ड पदार्थ मी पहिल्यांदा खाल्ला. तर एक ना दोन हिची अनेक रूपं...
नंतर लग्न झाल्यावर समजलं... सासरही पावभाजीफॅन मिळालयं. एकत्र कुटुंब असल्याने मोठ्ठ पातेलं भरून पावभाजी करावी लागायची. तिकडे सासूबाईंच्या हातची पावभाजी खूप फेमस. तो मान नेहमीच त्यांच्याकडे असायचा. मोठ्ठा कूकर भरून भाज्या शिजवायला लागायच्या. पावाच्या लाद्यांची संख्याही वीसच्या वर... एक-दोन पाव गॅसवर न भाजता अख्खी लादी तव्यावर ठेऊन , बटरमध्ये लोळवून भाजली जायची. भन्नाट कार्यक्रम असायचा.
देश सोडून आल्यावरही पावभाजीची आवड तशीच, शिवाय सखासोबतीही पावभाजीवेडा मिळाल्याने सोने पे सुहागा...!!! इथे बाहेर काही चमचमीत मिळत नाही मग काय आमचा विकेंड चा प्लॅन ठरलेला- पावभ्भाज्जी! फक्त  छोटे पाव मिळत नसल्याने ब्रेडभाजी खायचो. काही दिवसांनी या ब्रेडचा कंटाळा येऊ लागला. फेसबूकावर फिरताना पावाची रेसिपी दिसली, मग हा किडा डोक्यात वळवळू लागला. झालं... मग सामानाची यादी केली. काही वेगळं म्हणून मैद्याऐवजी कणीक वापरून पहायचं ठरवलं. त्या रात्री माझ्या स्वप्नात लुसलुशीत पावांची लादी ओव्हन मधून बाहेर आली, माझ्याकडे पाहून गोडुलं हासली आणि भाजीच्या वाटीसोबत ताटात जाउन बसली. स्वप्न खरी होत नसतात असं मला लहानपणी कोणीतरी सांगितलेलं. पण आता यावर माझा काडीचाही विश्वास नाही. अहो, हे पावाच स्व्प्न खरं झालं की माझं... दुसर्‍या दिवशी आम्ही दोघे त्या अस्सल होममेड पावभाजीवर तुटून पडलो. काय शांती लाभली जीवास म्हणून सांगू! बरच फोटोसेशन करून ते फेसबूकवर टाकून सेलीब्रेशनही झालं.


एकूण काय तर ही पावभाजी माझी जीवलग मैत्रिणच म्हणावी लागेल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात तिच्या गोड गोड... सॉरी झणझणीत आठवणी ठेवतेय. चला... आता सारखं पावभाजी पावभाजी लिहून लिहून कंटाळा आलाय मला. आता या विकेंड ला पावभाजी केल्याशिवाय जीवाला शांती नाही मिळणार. मग नक्की "पावभाजी शोधणार्‍याला सुखी ठेव रे बाबा!" असं म्हणायला विसरणार मात्र नाही.  

Wednesday, August 3, 2016

पहिली ट्रीट (Israel diaries)

इकडे आल्यापासून एक जाणवलयं, माझं मसालेदार, चमचमीत पदार्थ खाण्याचं प्रमाण खूप कमी झालयं. Credit goes to Israeli food. सकाळी चीझ सँडवीच खाताना माझं मन धावत धावत भूतकाळात गेलं.
बघता बघता इस्राईल मध्ये येऊन मला दोन वर्ष पूर्ण झाली. प्रशांत-माझे मिस्टर, ते माझ्याआधी वर्षभर इथे आले, त्यामुळे इथल्या पदार्थांची ओळख मला त्यांच्याकडूनच झाली. फार गोडवे गायल्यामुळे, मलाही 'कधी एकदा इकडे येऊन नवीन पद्धतीचे पदार्थ खातेय असं झालं'. पण पहिल्या अनुभवानंतर सार्‍या उत्साहाचा बोर्‍याच वाजला म्हणायचा. आम्ही पहिल्यांदा तेल-अविवला आऊटींग साठी गेलो. बीचेस आणि जुने शहर फिरल्यावर हुम्मुस( चण्यापासोसून बनवलेला इथला प्रसिद्ध पदार्थ) खायचा आमचा प्लॅन होता. "आज तू हुम्मुस एकदा खाल्लास की त्याच्या प्रेमात पडणार हे नक्की!!!" या challenge ची भर प्रशांतनी त्यात घातली होती. ही त्यांच्याकडून दिली जाणारी पहिली ट्रीट होती. त्यामुळे आता काहीतरी वेगळं, भारी खायला मिळणार म्हणून माझ्या मनात "लड्डू फूट रहे थे" अशी भावना होती.
झालं... ठरल्या प्रमाणे आम्ही बीच वर वेळ घालवून, रेस्टोरंटच्या स्ट्रीट वर आलो. बराच वेळ शोधून छोटंसं रेस्टोरंट निवडलं, त्याच कारण ही असं, बघा... बाहेर मेन्यू लावलेला तो इंग्रजीत होता म्हणजे आत कोणीतरी इंग्रजी बोलणारं असलं पाहिजे असा तर्क लाऊन आम्ही आत टेबलवर जाऊन बसलो. मग काही वेळातच पाणी आणि ऑर्डर द्यायच्या आधी अँटीपेस्तोच्या छोट्या छोट्या डिशेश टेबलवर सर्व्ह झाल्या. त्यात वेगवेगळ्या २-३ प्रकारचे ऑलिव्ह्ज, मुरवलेली काकडी, कांदा आणि बीट्च सॅलाड होतं.  ऑलिव्ह्ज माझं भलतच आवडतं प्रकरण... त्यामुळे काहीतरी इंटरेस्टींग येणार टेबलवर असा अंदाज बांधला. थोड्याच वेळात आमची ऑर्डर टेबलावर आली. हुम्मुस- ऑफ व्हाईट रंगाची भिजवून ऊकडलेल्या चण्याची पेस्ट, त्यात लसूण, तीळाची पेस्ट घातलेली असते, वर भरपूर ऑलिव्ह ऑइल आणि कोथिंबीर. अशी डिश पुढ्यात आली, हे रोटी सारख्या गोल ब्रेडसोबत खातात. असले पेस्ट सारखे पदार्थ भारतीय जेवणपद्धतीत नसल्याने थोडं कसतरी झालं, पण पतिराजांनी एवढं कौतुकाने इथे आल्यावर पहिल्यांदा काहीतरी मागवलयं म्हणल्यावर चेहर्‍यावरचे भाव तरी तसे नकोत का???  पण फलाफल आल्यावर जरा बरं वाटलं, हे म्हणजे आपल्या भजी, वडे, कट्लेट इ. च्या रांगेत बसणारं, चण्याचे वडे म्हणूया.
पहिला घास घेतला, तसं माझं तोंड बघण्यासारख झालेलं. फलाफलच्या बाबतीतही तीच तर्‍हा... पहिला घास खाल्यावर टोमॅटो चा भलामोठा तुकडा आला. तिखट, गोड, आंबट, खारट, कडू यापैकी मला माहित असलेल्या सगळ्या चवी आठवून बघीतल्या, कशातच बसेना हे.. सगळा चवींचा गुंताच. या सगळ्या चवी आपल्या भारतीय लोकांच्या रक्तात भिनल्यात. त्यात बाहेरचं खायचं म्हणलं की मी तरी... पाणीपुरी, भेळ, सांबार- डोसा, मिसळ किंवा पंजाबी भाज्या, मसालापापड, रसगुल्ले असच काहीतरी डोक्यात धरून चालते. त्यामुळे इथेही असं चमचमीत मिळणार हेच माझ्या डोक्यात... अजुन २-३ घास खाल्ल्यावर, आता कुठे पळून जाउ असं वाटलं.  तेच भाव माझ्या चेहर्‍यावर ऊमटू लागले (कदाचीत हे सगळ्यांना दिसत असावं)." त्यामुळे हीला का आपण इथे घेऊन आलो?" किंवा "ही अशीच उठून जाणार तर नाही ना?" असे विचार नक्कीच प्रशांतच्या मनात आले असणार... दोघेही गप्पच... "अन्न हे पूर्णब्रम्ह" हे डोळ्यांसमोर आणून मी कसंबसं पोटात ढकललं... हे झाल्यावर वरताण म्हणून...त्या अँटीपेस्तोच्या डिशेशचाही भरमसाठ चार्ज असलेले बील आणि टीप ठेऊन आम्ही काढता पाय घेतला. अगदीच वाईट किंवा बेचव होते हे पदार्थ असे नाही, पण जीव्हेच्या चोचल्यांमुळे जिवावर आले होते. घरी आल्यावर मस्त झणझणीत मसालेभात पोटात गेल्यावर बरं वाटलं. काही दिवसांनी पुन्हा ह्यांच्या आग्रहाखातर हुम्मुस खायला गेलो. तेव्हा आमच्या शहरातल्या एका प्रसिद्ध रेस्टोरंट मध्ये गेलो. तिथे जरा बरं वाटलं. मग सकस, पौष्टीक आहाराचे महत्त्व पटल्यावर सारखेच तिकडे जाणे सुरू झाले.
आमच्या लॅब मध्ये भारतीय मुलगी नुकतीच post doc म्हणून रूजू झालीय. परवा तिच्याशी गप्पा मारता मारता, मी तिला विचारलं "हुम्मुस खाऊन बघितला का?" तेव्हा तिने "हो" म्हणून कससच तोंड केलं. मला जाम हसू आलं. तेव्हा मला आमच्या या पहिल्या ट्रीटची आठवण झाली.

घरच्या जेवणात बदल म्हणून आम्ही वेगवेगळे सॅलाड्स, बुरेका(चीझ सामोसे), फलाफल(चण्याचे वडे), हामेन्ताश कुकिज(त्रिकोणी बिस्किटे, त्यात चेरी,अंजीर असे भरलेले असते, पण फारशी गोड नसतात), खारी बिस्किटे असे खातो. हे इस्रायली पदार्थ आता आवडीने खायची सवय लागलीय. अर्थात मी याची तुलना भारतीय पदार्थांशी कधीच करत नाही. जे ते आपापल्या जागी उत्तम.