Tuesday, August 8, 2017

बालपणीचा काळ सुखाचा


काही दिवसांपूर्वी मॉल मध्ये पुतण्यासाठी खेळणी शोधत होते. त्या दुकानात मुलींच्या टॉय्ज सेक्शन मध्ये सहज लक्ष गेलं. पाहिलं तर मुलांपेक्षा मुलींच्या सेक्शनला जास्त व्हरायटी होती. खास छोटे छोटे दागिने बनवण्यासाठी रंगीत बीड्स , रंगीबेरंगी बाहुल्या त्यांचे ड्रेसेस... भरीस भर म्हणून छोटुकले स्ट्रॉलर पण...भलताच इंटरेस्ट आला म्हणून थोडं पुढे चालत गेले तर पुढे मोठ्ठ्या कपाटात वेगवेगळ्या डिझाईन्सचे टॉय किचन्स लावून ठेवलेले. त्यात खोटाखोटा गॅस, पॅन्स, छोटी भांडी काहींम्धे तर फ्रिज आणि ओव्हनही होता... तिथे एक 6-7 वर्षांची छोटुकली "हा सेट घेऊया ना" म्हणून आईजवळ हट्ट करत होती. माझं मन नकळत भूतकाळात गेलं.



तो दिवस आठवला, ज्या दिवशी माझ्या आज्जीने पिशवी भरून भातुकलीचा खेळ दिलेला. सग्गळी भांडी पितळेची...छोटे तवे, कप-बश्या, कढया, चमचे झारे...हे कमी काय म्हणून त्यात आमच्या आजोबांनी मातीची चूल आणि चिनी मातीच्या कप-बश्यांचा सेटची भर घातली. ते सगळं बघून आनंद गगनात मावत नव्हता. ती भातुकली परंपरागत म्हटली तरी चालेल. आधी ती माझ्या आईने वापरली, मग मावशीने नंतर ती माझ्याकडे आली. आमच्या आवडीनुसार काही स्टीलची खेळणी आम्ही त्यात टाकली होती. अर्थात त्यातली बरीच खेळणी वजा झाली होती-काही हरवली, काही मोडली पण त्यात भरलेला आनंद सारखाच होता.

दिवाळी आणि ऊन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही भावंडे एकत्र जमायचो. ती पितळी भातुकली माळ्यावरून खाली यायची. मग आमचा ठरलेला प्रोग्राम असायचा. घरातल्या बायकांकडून चिंच, मीठ, लिंबू, राख अशा गोष्टी जमवायला सुरूवात व्हायची. नारळाच्या केसरांची घासणी बनवून घेतली कि छोटुकली फौज कामाला लागायची. नीट एक-एक भांडे जमेल त्या पद्धतीने घासून चमकवले जायचे.  एकाने भांडी धुवायची, एकजण ती सगळी घासायचा, एकजण धुवून घ्यायचा आणि मग शेवटचा टप्पा- ती सगळी भातुकली अंगणात उन्हात पसरवून वाळवली जायची. अश्या मोठ्ठ्या "अवघड" कार्यक्रमानंतर घरातल्या बायकांकडून "बाई गं खूप काम केलं आज पोरांनी!" असे कौतुकास्पद शब्द ऐकवले जायचे आणि मग मस्त पोरांचा आवडता भेळीचा किंवा आवडत्या पदार्थाचा कार्यक्रम व्हायचा. 

त्यानंतर आमची भातुकली खेळायला तयार... पोरं-पोरी सगळे यात सहभागी असायचे. कधी गच्चीत, कधी अंगणात झाडाखाली चादरीचा तंबू घातला जायचा. भर दुपारी ऊन असेल तर आम्हा पोरांना बाहेर जाता येणार नाही अशी सक्त ताकिद असायची. त्यामुळे हा भातुकलीचा खेळ भारी रंगायचा. दररोज घरात घडणार्‍या गोष्टी तिथे यायच्या. पाण्याच्या घागरी भरून आकारानुसार त्याची रास मांडली जायची. यात बरेच नकली नट असायचे- सकाळी दूधवाला दूध घालायला यायचा, पेपरवाला पेपर टाकून जायचा. एखादा पोस्ट्मन मधेअधे पत्र घेऊन यायचा. कोणी ऑफिसला जायचं, कोणी स्वयंपाक करायचं. बरेचदा एकालाच २-३ भूमिका कराव्या लागायच्या. वाळू, फुले-पाने,कापूस यांचा खोट्या खोट्या जेवणात उपयोग केला जायचा. मग खाऊ म्हणून चुरमुळे, शेव, काजू-बदाम आणि आमचे आवडते गुळ-शेंगदाण्याचे लाडू यायचे. धम्माल असायची. कधीकधी आजोबा जवळ बसले असायचे. मग त्यांच्या देखरेखीखाली चूल पेटवली जायची. त्यावर पातेल्यात दूध गरम करून चहा ..(खर्राखुर्रा हं) बनवला जायचा. तो सर्वांना छोट्याशा पितळी कपबशात द्यायचा.

एकदा तर आम्ही घराला चक्क बेल बसवली होती... कार शूटींगचा गेम नवीनच घरात आलेला. त्यात काही प्लास्टीकच्या कार होत्या आणि त्याला एक स्टँड. त्या स्टँडमध्ये कार अडकवायची आणि बटन दाबले कि ती कार उडून सुसाट पुढे जायची.  खेळून खेळून त्याचा पिट्टा पडलेला. कंटाळा आला तशी ही कल्पना आमच्या डोक्यात आली.  तसे ते स्टँड आम्ही घराची बेल म्हणून वापरू लागलो. अर्थात त्यातून काही आवाज व्हायचा नाही पण गाडी उडून घरात यायची आणि "दार उघडा" असा संदेश मिळायचा. एकदा तर हद्द झाली... एका छोट्या भावाने त्याच्या रबरी खेळण्यातली पाल भातुकलीत खेळायला आणली. 'ईईई...ही का आणलीस?' असे विचारल्यावर म्हणतो कसा, 'घरात भिंतीवर पाल असते कि तशी आपल्या भातुकली मध्ये नको का?'  आम्ही किळसवाण्या नजरेने त्याच्याकडे बघितलं.  असे एक ना दोन, अनेक उद्योग!!!
सुट्टी संपत आली कि ती भातुकली धुवून पुसून परत माळ्यावर स्थिरावायची, पुढच्या सुट्टीची वाट बघत...

पुढे जसे आम्ही मोठे होत गेलो... अभ्यास वाढला, तसं सुट्ट्यांमधे गावी जाणं कमी झालं. सुट्ट्याही कमी झाल्या. मग आज्जी आम्ही येणार म्हटलो कि भांडी साफ-सूफ करून ठेवायची. नंतर नंतर तेही कमी झालं.

हा किचन सेट बघता बघता बालपणीच्या त्या गोड आठवणींनी डोळे भरून आले. दोन्हीमध्ये जमीन- आसमानाचा फरक असला  तरी भावना त्याच होत्या. एवढ्या वेळात बहुतेक त्या मायालेकिंचा निर्णय झाला असावा. हे 'किचन चांगलं कि ते' यात दोघींची चढाओढ सुरू होती. "चला, या छोटुकलीलाही तिचा आनंद गवसणार बहुदा" या आनंदातच मी तिथून काढता पाय घेतला.





No comments:

Post a Comment